केज येथील बाजाराला आळा; पोलीस तहसीलदार सकाळीच उतरले रस्त्यावर

बीड: कोरोनाचे नियम पायदळी तुडवत अनेक गावांमध्ये सर्रासपणे बाजार भरवणे सुरु आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखी वाढतो, मात्र याचे गांभीर्य लक्षात न घेताच येथील गावकरी आठवडी बाजार भरवत होते. केज तालुक्यात देखील मागच्या वेळेस बाजार भरवला होता. येथील परिस्थिती गंभीर आहे, रोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे तरी देखील येथील नागरिकांना शिस्त लागली नाही. याच पार्श्वभूमीवर तहसीलदार व पोलीस मंगळवारी सकाळीच रस्त्यावर उतरले, त्यामुळे बाजार बसवता आला नाही.

केज शहरात मंगळवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बाजार भरण्यापूर्वी तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक सकाळीच हजर झाले. शिवाय शहराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर कडक नाकाबंदी करण्यात आली. प्रशासनाने अगोदर प्रतिबंध करून ठेवल्याने बाजारही भरला नाही. शिवाय रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांची अँटिजन टेस्ट केली जात असल्याने नागरिकांच्या वर्दळीवर अंकुश बसला आहे.

केज तालुक्यात कोरोनाचे दररोज शेकडो रुग्ण निघत असून शहरातील सर्व कोविड केअर सेंटर रुग्णांनी खचाखच भरले आहेत. तरी ही गांभीर्य नसलेले नागरिक रस्त्यावर फिरत होते. भाजीपाला विक्रेत्यांनी शुक्रवारी आठवडी बाजार भरविला होता. शिवाय संचारबंदीतून सकाळच्या सत्रात दिलेल्या सवलतीच्या वेळेत नागरिकांची मोठी वर्दळ सुरू राहत होती. तहसीलदार दुलाजी मेंडके हे दिवसभर फिरून नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांचा मुक्त संचार सुरू होता. त्यामुळे तहसीलदारांनी पोलीस, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरवून मागील चार दिवसांपासून मोकाट फिरणाऱ्या लोकांची अँटीजन टेस्ट करण्याची मोहीम सुरू केल्याने सुपर स्प्रेडर सापडत आहेत.

आठवडी बाजारावर बंदी असतानाही ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर भाजीपाला घेऊन शहरात येत असल्याने पंचायत समितीच्या मैदानावर मोठी गर्दी होत होती. मात्र आज सकाळीच यावर प्रतिबंध घालण्यासाठी तहसीलदार दुलाजी मेंडके, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्यासह नगरपंचायतीचे सदस्य यांनी शहरात चारी बाजूने नाकाबंदी करून भाजीपाला विक्रेत्यांना येण्यास मज्जाव केला.

महत्वाच्या बातम्या