‘बा विठ्ठला’ बळीराजाला सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचे साकडे

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूर दौरा रद्द झाल्यानंतर त्यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक, कुटुंबियासह विठ्ठल- रखुमाईच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी त्यांनी, राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, सकलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी मनोभावे प्रार्थना केली. याबाबतची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटवरून दिली आहे.

मराठा समाजाच्या तीव्र आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथील विठ्ठलाच्या महापूजेला जाण्याचे टाळले. तसेच पंढरपूरात दाखल झालेल्या 10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मी पंढरपूरात विठ्ठलाची महापूजा करणार नाही. मात्र, 12 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचा प्रतिनिधी आणि विठ्ठलाचा सेवक म्हणून मुंबईतील वर्षा बंगल्यावर सपत्नीक विठ्ठलाची पूजा करणार असल्याचे फडणवीस यांनी रविवारीच सांगितले होते. यावेळी त्यांनी, राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, सकलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी मनोभावे प्रार्थना केली.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.