अहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का

bjp and congress

अहमदनगर : बालेकिल्ला असलेल्या केडगावमधील काँग्रेसचे पाच उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी भाजपात दाखल झाले. भाजपाच्या या डावामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसला आहे.काँग्रेसच्या १६ व १७ प्रभगांतून काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या सर्वानाच भाजपने उमेदवारी दिल्याने काँग्रेस चारीमुंड्या चित झाले आहे.

शिवसेनेने लक्ष्य केलेले व खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे भानुदास कोतकर यांच्या समर्थक उमेदवारांना भाजपाने प्रवेश दिला. केडगावमध्ये एप्रिलमध्ये दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. त्यानंतर कोतकर व राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांची दहशत असल्याचा आरोप केला होता.

दरम्यान,महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या 68 जागांसाठी तब्बल 715 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारपर्यंत 222 अर्ज दाखल झाले होते. तर मंगळवारी (दि.20) शेवटच्या दिवशी आणखी 493 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी (दि.22) या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. माघार घेण्यासाठी 26 नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.