शहराची दुधाची गरज लक्षात घेता कात्रज डेअरी सुरूच राहणार

पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने टप्प्याटप्याने शहरातील विविध भाग ‘सील’ करण्यास पुणे पोलिसांनी सुरूवात केली आहे. गुरूवारी सकाळी कात्रज परिसर ‘सील’ करण्यात आला. अशातच राज्यात लॉकडाऊनच्या या कालवधीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला आहे. मात्र पोलिसांनी अत्यावश्यक सेवांमध्ये येत असलेली दुकानेसुद्धा सकाळी ११ वाजेपर्यंतच चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

या संकटाच्या काळात पुणे शहराला दुधाची टंचाई भासू नये, यासाठी कात्रज डेअरी सुरु ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे कात्रज परिसर ‘सील’ केला असला तरी संचारबंदीच्या नियमांचे पालन करत डेअरी नेहमीप्रमाणे चालू राहणार असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी गुरुवारी सांगितले.

डॉ. क्षीरसागर म्हणाले, राज्य सरकारचा आदेश आणि शहराची दुधाची गरज लक्षात घेता, डेअरी प्रशासनाने पुण्याचे प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी प्रशांत मोहोड यांना हि बाब लक्षात आणून दिली. त्यामुळे आता पोलिसांचा आदेश असला तरी सरकारच्या लेखी आदेशाशिवाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डेअरी बंद ठेवता येणार नाही. त्यामुळे संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करत डेअरी सुरु राहणार आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग’, कमाल पाच लोकांनाच प्रवेश, गर्दी टाळणे आणि डेअरीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या अंगावर निर्जंतुकीकरणाचा स्प्रे मारला जाणार आहे.