कुर्णोली ग्रामसेविकेविरुद्ध पोलिसात तक्रार

अभिजित कटके

नाशिक :-कुर्णोली ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून महत्वाची कागदपत्रे नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या निलंबित ग्रामसेविकेविरुद्ध सरपंचासह पदाधिका-यांनी घोटी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच या ग्रामसेविकेवर निलंबनाची कारवाई झाल्याने त्यांना महिनाभर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. 23 जानेवारी रोजी गट विकास अधिका-यांनी या ग्रामपंचायतीचा चार्ज कावनई येथे असलेले ग्रामसेवक रहाडे यांच्याकडे सोपवावा, असे पत्र ग्रामसेविका सोनवणे यांना दिले.

तत्पूर्वी रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून त्यांनी कागदपत्रे नेण्याचा प्रयत्न केल्याचे सरपंच वेणूबाई तेलम यांना समजले. त्यांनी तात्काळ कार्यालय गाठून याबाबत विचारणा केली असता, मला चार्ज सोडायचा आहे. तत्पूर्वी सर्व दफ्तर तपासून यादी बनवण्याचे काम सुरू असल्याचे ग्रामसेविका सोनवणेंनी सांगितले. रविवारची शासकीय सुट्टी आहे, चार्ज सोडायचा असेल तर नवे ग्रामसेवक कुठे आहे, कार्यालयाचे कुलूप तोडायचे कारण काय, असे प्रश्न सरपंच तेलम यांनी केले.

दरम्यान, घोटी पोलिसात त्यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान ग्रामसेविका सोनवणे यांनी आरोपांचे खंडण करीत ते चुकीचे अन बिनबुडाचे असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतचा चार्ज सोडायचा असल्याने दफ्तराची यादी बनवण्यासाठी कार्यालयात गेल्यानंतर महिला पदाधिका-यांनी अर्वाच्च्य शब्दांत बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु काही न बोलता निघून गेल्याचे या ग्रामसेविकेने सांगितले. मी मेडिकल रजेवर असताना ग. वि. अधिका-यांच्या आदेशानुसार चार्ज सोडण्यापूर्वी दफ्तराची यादी बनवून देण्यासाठी गेले होते. शिपाई हजर नसल्याने मी कडीतून कुलूप काढले. माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे असून, हेतुपुरस्सर मला बदनाम केले जात आहे- अजली सोनवणे, ग्रामसेविका