कुमारस्वामी यांच्या शपथग्रहण सोहळ्यात विरोधक करणार शक्तीप्रदर्शन

बंगळुरु – बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कॉंग्रेसने पाठींबा दिलेले कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. कर्नाटकात येत्या सोमवारी नवीन सरकार अस्तित्वात येणार होते. पण आता शपथविधीचा दिवस बदलण्यात आला आहे.

कुमारस्वामी आता सोमवार ऐवजी बुधवारी २३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जनता दल सेक्युलरचे राष्ट्रीय सचिव दानिश अली यांनी ही माहिती दिली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान कुमारस्वामी स्वामी यांच्या शपथग्रहण सोहळ्यात भाजपला एकजुटीचा इशारा देण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळेच कुमारस्वामी जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तेव्हा विरोधी पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यासाठी देशभरातील प्रमुख 17 विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठवले असल्याचं वृत्त आहे.