‘असा’ असेल कुमारस्वामी यांचा शाही शपथग्रहण सोहळा

बंगळुरु : भाजप नेते येडियुरप्पा यांनी 19 मे रोजी बहुमत सिद्ध न करता आल्याने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान आता जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल वजूभाई वाला हे कुमारस्वामींना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.तर उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे जी. परमेश्वर हे शपथ घेतील. त्यामुळे आजपासून कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार सत्तेवर येईल.

कुमारस्वामी यांनी स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार के. आर. रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील. मंगळवारी काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या शपथविधीसाठी बंगळुरुमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे.

कुमारस्वामी यांनी देशभरातील नेत्यांना शपथविधीचं निमंत्रण दिलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल एक लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवाल, मायावती, चंद्राबाबू नायडू कमल हसन हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.