कर्नाटकातील बंडखोर आमदारांपैकी एक आमदार फुटला, म्हणे मी सरकारच्या बाजूने

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यांमुळे कॉंग्रेस-जेडीएस सरकार धोक्यात आले आहे. मात्र आता बंडखोर आमदारांपैकी एक आमदार फुटला असून मी सरकार सोबत आहे, असा दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामींना आता थोडासा दिलासा मिळाला आहे. इतर आमदार देखील आपला बंडाचा निर्णय बदलून पुन्हा सरकारमधील येतील असा अंदाज लावत आहेत.

काँग्रेसचे संकटमोचक मानले जाणारे डी. के. शिवकुमार यांनी बांधकाम मंत्री एम. टी. बी नागराज यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली आहे. त्यांनी जवळपास पाच तास त्यांच्याशी चर्चा केली. आणि त्यानंतर नागराज काँग्रेससोबतच राहणार असल्याची माहिती शिवकुमार यांनी दिली.

काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये आमदारांच्या राजीनाम्याचे सत्र सुरु आहे. कॉंग्रेसच्या १३ आमदारांनी आणि त्यानंतर सरकारमधील एका अपक्ष मंत्र्याने राजीनामा दिला होता. मात्र हे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी फेटाळले. जर हे राजीनामे स्वीकारले असते तर कुमारस्वामींचे सरकार धोक्यात आले असते. मात्र आता कुमारस्वामी यांनी विश्वास दर्शक ठरावाला आपण सामोरे जाणार असल्याचं सांगितल आहे. कर्नाटकच्या अधिवेशनावेळी कुमारस्वामींनी विश्वास दर्शक ठरावाबाबतचे वक्तव्य केले आहे.

कर्नाटकातील सरकार कोसळणार अशी स्थिती विरोधकांकडून करण्यात आली होती. दरम्यान, आपण विश्वास दर्शक ठरावाला आपण सामोरे जाणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कर्नाटकात काय होणार, याचीच जास्त चर्चा आहे.