‘ऑपरेशन कमळ’साठी आशिष शेलार स्पेशल चार्टर्ड विमानाने बंगळुरूला रवाना

shelar aashish

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक विधानसभेत भाजपला बहुमत सिध्द करण्यासाठी नाकीनऊ येऊ शकतात. आज (१९ मे ) दुपारी ४ वाजता भाजपला बहुमत सिध्द करायचं आहे.

कर्नाटकात आज सत्ता स्थापनेच्या निर्णायक टप्प्याला ‘ऑपरेशन कमळ’ असं नाव दिले आहे. या स्पेशल ऑपरेशन टीममध्ये पक्ष श्रेष्टींकडून महाराष्ट्रातून आमदार आशिष शेलार यांना पाचारण करण्यात आलं आहे. सत्तेची जुळवाजुळव करण्यासाठी आशिष शेलार आज सकाळी बंगळुरूच्या दिशेने स्पेशल चार्टर्ड विमानाने रवाना झाले आहेत.

कर्नाटक निवडणुकीत आशिष शेलार यांच्याकडे ४७ मतदारसंघाची जबाबदरी होती. बंगळुरु ग्रामीण आणि शहर या भागात आशिष शेलार निवडणूक काळात तळ ठोकून होते. त्यामुळे कर्नाटकच्या लढाईसाठी भाजपने महाराष्ट्रातून कुमक पाठवली आहे.

२२४ जागांच्या कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपला १०४, काँग्रेसला ७८, जेडीएस ३८ आणि अन्य २ जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा ११२ इतका आहे. मात्र सध्या भाजपकडे १०४ आणि एक अपक्ष असे एकूण १०५ आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपला अजूनही ७ जागा कमी पडत आहेत.