कर्जमाफीसाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याची अखेर आत्महत्या

टीम महाराष्ट्र देशा: डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या काही केल्या थांबताना दिसत नाहीत. आता आपल कर्जमाफ व्हाव यासाठी जिल्हाधिकाऱ्यापासून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. इरप्पा (वय ५७ वर्षे) असे या शेतकऱ्याचे नाव असून ते कर्नाटक राज्यातील बगलकोट जिल्ह्यातील नगानापुरा गावाचे रहिवाशी होते. इरप्पांनी २ मार्चला पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. तर २० मार्चला पंतप्रधान कार्यालयाने इरप्पांच्या पत्राला उत्तर देत प्रमुख सचिवांना समस्येकडे लक्ष देण्याची सूचना केली होती.

इराप्पा यांच्यावर राष्ट्रीय बँकेचे ३ लाखांचे तर जमीन खरेदीचे १० लाखांचे कर्ज होते. सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे ते कर्जाखाली दाबले गेले होते. दरम्यान इरप्पा यांनी पंतप्रधानांसह कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनाही कर्जमाफीसाठी पत्र लिहिले होते. मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली होती. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्यापेक्षा, तो शेतकरी जीवंत असतानाच मदत करुन समस्या सोडवण्याचे आवाहन इरप्पा यांनी पत्रातून केले होते.