fbpx

‘ज्यांनी देशात आणीबाणी लागू केली, त्यांनी आम्हाला घटना शिकवू नये’

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे.कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसं संख्याबळ नसतानाही राज्यपालांनी भाजपाला संधी दिल्यानं काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी राज्यपालांवर तोंडसुख घेतलं. यानंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर शरसंधान साधलं. ज्यांना देशात आणीबाणी लागू केली, त्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं त्यांना सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं जाऊ नये, अशी भूमिका काँग्रेस आणि जेडीएसनं घेतली होती. मात्र राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानं काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. काँग्रेसच्या या टीकेला भाजपानं जोरदार प्रत्युत्तर दिलं.

‘6 डिसेंबर 1992 नंतर काँग्रेस पक्षानं अनेक राज्यांमधील भाजपाची सरकारं बरखास्त केली होती. बाबरी मशीद पाडण्याची घटना उत्तर प्रदेशात घडली होती. मात्र यावरुन मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीमधील भाजपा सरकारं पाडण्यात आली होती. काँग्रेसनं राज्यांमध्ये घटनाबाह्य पद्धतीनं आणीबाणी लागू केली होती. घटना उद्ध्वस्त करणाऱ्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत,’ अशा शब्दांमध्ये प्रसाद यांनी काँग्रेसच्या टीकेला उत्तर दिलं.

3 Comments

Click here to post a comment