कुमारस्वामी आज घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हत. मात्र भाजप १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यांना बहुमतासाठी आणखी ८ जागांची आवश्यकता होती. तर दुसरीकडे कॉंग्रेसने जेडीएसला पाठींबा देत राज्यपालांकडे सत्ता स्थापण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी कॉंग्रेस एवजी भाजपला सत्ता स्थापण्यासाठी बोलावल्याने कॉंग्रेसने या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार भाजपला बहुमत सिद्ध न करता आल्याने भाजपने सत्ता गमावली.

दरम्यान आता जेडीएसचे नेते कुमारस्वामी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज होणाऱ्या या शपथविधीस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसप अध्यक्षा मायावती, सपचे अध्यक्ष अखिलेश यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि अनेक प्रादेशिक नेते उपस्थित राहणार आहेत.