आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले नाही तर रक्ताचे पाट वाहतील ; कॉंग्रेसची धमकी

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकच्या निवडणुकीत राजकारणाने आपली पातळी सोडल्याचे वेळोवेळी दिसून आलं. मात्र आता राज्यपालांनी घटनेचे पालन केले नाही आणि आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले नाही तर रक्ताचे पाट वाहतील अशी खुली धमकीच काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आझाद यांनी ही धमकी दिली आहे.

काँग्रेसचे आमदार असंतुष्ट असल्याचा भाजप खोटा प्रचार करीत आहे, प्रत्यक्षात भाजप हीच असंतुष्ट आहे असंही ते म्हणाले. भाजपकडे १०४ जागा आहेत तर काँग्रेस आणि जेडीएस मिळून आमच्याकडे ११७चा आकडा आहे. असा परिस्थितीत राज्यपाल भेदभाव करू शकत नाही असे गुलाब नबी आझाद म्हणाले आहेत.

आता सत्तास्थापनेसाठी कालपासून धडपड करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांच्या संयम ढळायला लागलाय की काय असं वाटायला लागलं आहे.

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत असताना आता भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येडीयुरप्पा हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. बीएस येडीयुरप्पा यांनी स्वतः माहिती दिली आहे. कॉंग्रेसने जेडीएस ला दिलेला पाठींबा मान्य नसल्याचं सांगत कॉंग्रेसवर त्यांचाच पक्षातील नवनिर्वाचित लिंगायत आमदारांनी नाराजी दर्शविल्यामुळे कर्नाटक मध्ये कॉंग्रेसपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे सात जेडीएसचे चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आल्याने कर्नाटक निवडणुकीत आणखी रंगत आली आहे.

येडीयुरप्पा यांची आज सकाळी विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजभवनाकडे येडीयुरप्पा यांनी प्रस्थान केलं असून कर्नाटकमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत आहेत.

Gadgil