तुमचा अन्ना मुख्यमंत्री झालाय मात्र… ; कुमारस्वामींना अश्रू अनावर

टीम महाराष्ट्र देशा : माझ्या पक्षातील लोकं आनंदात आहेत कारण त्यांचा अन्ना मुख्यमंत्री झालाय. मात्र, वर्तमान स्थितीमुळे मी अजिबात खूष नाहीये. कोणालाही न सांगता स्वतःचं दुःख लपवावं लागतंय, जे वीष पचवण्यापेक्षा कमी नाहीये. सध्या जे काही चाललंय त्यामुळे मी अजिबात आनंदी नाहीये. ज्या सरकारला स्पष्ट जनादेश मिळालेला नाही, त्या सरकारचं नेतृत्व करण्यात कोणताच आनंद मला नाहीये.

गेल्या एका महिन्यापासून कर्जमाफीसाठी अधिकाऱ्यांकडे किती विनंती करावी लागली आणि अजून काय-काय करावं लागलंय हे मलाच माहितीये. आता अन्नभाग्य योजनेअंतर्गत ५ किलोच्या जागी ७ किलो तांदूळ मागतायेत, मी २५०० कोटी रुपये कुठून आणू , अशा शब्दांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पुन्हा एकदा युती सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान आपली हतबलता व्यक्त करताना कुमारस्वामी भावूक झाले. शनिवारी बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्याबद्दल जनता दल सेक्युलरने कुमारस्वामींच्या सन्मासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी कुमारस्वामींनी आपलं दुःख बोलून दाखवलं.

मुख्यमंत्री बनण्यामागे माझा कोणताही स्वार्थ नव्हता, केवळ जनतेची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री बनायची इच्छा होती, असं म्हणताना त्यांनी कर्नाटकच्या जनतेवरही आपला रोष व्यक्त केला, मतदानाच्या वेळी जनता त्यांना आणि त्यांच्या पक्षाला विसरली होती असं ते म्हणाले. त्यामुळे आता कर्नाटक सरकार मध्ये पुन्हा एकदा असंतोष असल्याच समोर आल आहे.