कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी देणार राजीनामा?

टीम महाराष्ट्र देशा –  कर्नाटकमधील राजकीय नाट्य काही केल्या संपताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी दोन अपक्षांनी कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि हे राजकीय नाट्य सुरू झाले होते. आता मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची धमकी काँग्रेसला दिली आहे. त्यामुळे हा पेच अजूनच वाढला आहे.

काँग्रेसमधील सिद्धरामय्या समर्थकांकडून सतत कुमारस्वामी यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे कुमारस्वामी नाराज आहेत. काँग्रेस नेते त्यांची मर्यादा सोडत आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अशा नेत्यांना लगाम घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस आमदारांकडून असेच प्रकार सुरू राहिले तर आपण पद सोडू असा इशारा कुमारस्वामी यांनी दिला आहे.

दरम्यान, सिद्धरामय्या आमचे मुख्यमंत्री आहेत, असे विधान त्यांच्या समर्थकांनी रविवारी एका कार्यक्रमात केले होते. त्यामुळे कुमारस्वामी नाराज असल्याचे बोलले जाते आहे.

कॉंग्रेसमधील सिद्धरामय्या समर्थकांकडून आपल्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेतृत्वाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा आपण पद सोडू, असा इशारा कुमारस्वामी यांनी दिला आहे.