आगामी विधानसभा : करमाळ्यात बागलगटाच्या भवितव्याची लढाई !

करमाळा – लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना करमाळा तालुक्यातील नेते मंडळी मात्र आगामी विधानसभेची तयारी करताना दिसून येत आहे.

आगामी विधानसभा कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल आणि मकाई चे चेअरमन दिग्विजय बागल यांनी कंबर कसली असून मागील निवडणूकीत झालेल्या निसटता पराभवाची परत फेड करण्यासाठी सज्ज झालेले दिसून येत आहेत तर मागील २०१४ विधानसभेवर भगवा फडकवलेल्या शिवसेनेचे आमदार नारायण पाटील पुन्हा भगवा फडकवण्यासाठी जोरदार तयारीत असून आपण गेल्या चार वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहे.

दुसरी कडे २०१४ विधानसभेला महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान जि.प अध्यक्ष संजय शिंदे यांनीही तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. आगामी विधानसभा कुठलेही परिस्थितीत जिंकण्यासाठी त्यांनी सध्यातरी करमाळा तालुक्यावर चांगलीच नजर ठेवलेली आहे.

गेल्या विधानसभेनंतर तालुक्यात झालेल्या वेगवेगळ्या निवडणूकीत शिवसेनेचे आमदार नारायण पाटील एक पाऊल पुढे राहिलेले आहेत तर बागल गटाला आदिनाथ कारखान्यावर सत्ता मिळविण्यात यश मिळालेले आहे तर बाजार समिती निवडणूकीत ऐनवेळी विद्यमान चेअरमन शिवाजीराव बंडगर यांनी बंडखोरी केल्यामुळे बागल गटाला बाजार समितीवर सत्ता स्थापन करणे सोपे झाले पण ते किती काळ टिकणार हे येणारा काळच सांगेल.

आगामी विधानसभा चुरशीची होणार यात काही वादच नाही आमदार नारायण पाटील सध्यातरी एक पाऊल पुढे असून बागल गट सध्यातरी बॕकफुटवर दिसत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेवर बागल गटाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.