युतीच्या नीतीवर करमाळ्याचे भवितव्य; संवाद दौरे सुरू पण उमेदवारी गुलदस्त्यात 

blank

करमाळा/गौरव मोरे : विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आलेली असून करमाळा विधानसभा मतदारसंघात सगळ्यांनीच संवाद दौरे सुरू केलेले असले तरी सध्यातरी शिवसेना-भाजप च्या युतीच्या नीतीवर सगळ्यांचे भवितव्य अवलंबून असून सर्व नेत्यांची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात आहे.

शिवसेनेचे आमदार नारायण पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल, जि प अध्यक्ष संजय शिंदे आणि माजी आमदार जयवंत जगताप यांच्यात पारंपरिक लढाई होणार हे जवळजवळ निश्चित असले तरी कोण कुठल्या राजकीय पक्षातून लढणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे भाजप मध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे युती झाली, तर करमाळ्याची जागा शिवसेनेची असल्यामुळे आमदार पाटील यांनी सावध भुमिका घेतलेली दिसून येत आहे. तर दुसरीकडे युती तुटली तर आमदार पाटील भाजप मधून लढण्याची दाट शक्यता आहे, कारण अकलूज चे मोहिते-पाटील सध्या राष्ट्रवादी सोडून भाजप मध्ये आलेले आहेत. मोहिते-पाटील आणि आमदार पाटील यांचे राजकीय संबंध चांगले असल्यामुळे आणि मागील २०१४ विधानसभेला मोहिते-पाटलांनी नारायण पाटील यांना चांगली मदत केलेली होती. त्यामुळे शिवसेना-भाजप युती झाली तर नारायण पाटलांना शिवसेनेकडून लढण्यात काहीही अडचण येणार नाही. परंतु युती तुटल्यास आणि आमदार पाटील शिवसेनेकडून लढल्यास मोहिते-पाटील यांची मदत घेणे त्यांना अवघड जाणार आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या प्रांतिक सदस्या रश्मी बागल यांनीही लोकसभेनंतर सावध भुमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी सध्या तालुकाभर संवाद दौरे सुरू केले असून सतत आपल्या वेगवेगळ्या पोस्टर तसेच सोशल मिडीयावर असलेले राष्ट्रवादीचे घड्याळ आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो सध्या गायब झालेला असून बागल गटाच्या कार्यकर्त्यांनीही काही दिवसांपूर्वी रश्मी बागल यांनी राष्ट्रवादी सोडून इतर पक्षातून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा केली होती. जर शिवसेना-भाजप युती झाली तर रश्मी बागल यांना पर्याय राहणार नाही आणि त्या राष्ट्रवादीकडून लढणार हे निश्चित आहे परंतु शिवसेना-भाजप युती झाली नाहीतर रश्मी बागल शिवसेनेकडून लढण्याची शक्यता आहे कारण काही दिवसांपासून तशी चर्चाही तालुकाभर सुरू आहे.

जि प अध्यक्ष संजय शिंदे राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या निवडणूकीत पराभुत झालेले होते. आगामी करमाळा विधानसभा लढवणार नसल्याचे जरी त्यांच्याकडून सांगण्यात येत असले, तरी त्यांच्या गटातून संजय शिंदे यांनी विधानसभा लढवावी अशी मागणी होत आहे. सध्यातरी संजय शिंदे आगामी विधानसभा लढवणार जवळजवळ निश्चित आहे. शिवसेना-भाजप युती झाली तर संजय शिंदे अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर युती तुटली आणि रश्मी बागलांनी शिवसेना किंवा भाजप कडून निवडणूक लढविली, तर संजय शिंदेना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळू शकते. तसेच संजय शिंदे शिवसेनेकडून ही निवडणूक लढणार असल्याचेही सध्या तालुकाभर चर्चा सुरू आहे.

एकंदरीत पहायला गेले तर सध्यातरी करमाळ्याचे राजकारण शिवसेना-भाजप युतीच्या नीतीवर अवलंबून असून कोण कुणाकडून लढणार हे गुलदस्त्यात असले, तरी तालुक्यातील सर्व नेत्यांनी सध्यातरी संवाद दौरे युतीच्या नीतीवर अवलंबून ठेवून सुरू ठेवलेले आहेत.

शिवसेना-भाजप युती तुटली तर अशी लढत होण्याची शक्यता

नारायण पाटील- भाजप
रश्मी बागल- शिवसेना
संजय शिंदे- राष्ट्रवादी
शंभुराजे जगताप- कॉंग्रेस

शिवसेना-भाजप युती झाली तर अशी लढत होण्याची शक्यता

नारायण पाटील- शिवसेना
रश्मी बागल- राष्ट्रवादी
संजय शिंदे- अपक्ष
शंभुराजे जगताप- अपक्ष

महत्वाच्या बातम्या