करमाळा बाजार समिती निवडणूक : जगताप-पाटील गटाचे दोन उमेदवार बिनविरोध

करमाळा – करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी मतदारसंघातील तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने माजी आमदार जयवंतराव जगताप व शिवसेनेचे आमदर नारायण पाटील यांच्या जगताप-पाटील गटाचे विजय गुगळे व मयुर दोशी यांचे दोनच अर्ज शिल्लक राहील्याने त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे.

बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघात एकूण पाच उमेदवारी अर्ज शिल्लक होते. सर्व अर्ज जगताप-पाटील गटाचे असल्याने त्यातील विद्यमान संचालक सुनील मेहता, प्रविण कुटे व सुनील सुरवसे यांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने व्यापारी मतदारसंघातील विजय गुगळे व मयुर दोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८६ अर्ज दाखल झाले होते. सध्यातरी दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेले असून २९ अॉगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने आणखी किती उमेदवार बिनविरोध होणार हे गुलदस्त्यात आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत जगताप-पाटील यांची युती झालेली असून बागल गट तसेच शिंदे गट स्वबळावर लढणार असल्याचे सध्याचे चित्र असून प्रथमच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे भाजप ने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचे घोषित केलेले आहे.

करमाळा : शेतकऱ्याचे प्रश्न केंद्रस्थानी ठेऊन निवडणूक लढवणार – दिपक चव्हाण