करमाळा बाजार समिती त्रिशंकू; सत्तेच्या चाव्या शिंदे-सावंत गटाच्या हातात

करमाळा- सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या करमाळा बाजार समिती निवडणूक त्रिशंकू झालेली असून एकाही गटाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे सत्तेच्या चाव्या शिंदे आणि सावंत गटाच्या हातात आलेल्या आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतमोजणी झाली. सकाळ पासूनच कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते परंतु ही निवडणूक आता त्रिशंकू परिस्थितीत असून बागल गटाला ८ जागा, पाटील-जगताप गटाला ८ जागा तर शिंदे आणि सावंत गटाला प्रत्येकी एक जागा मिळालेली आहे.

१८ जागांसाठी ही निवडणूक लागली होती. त्यापैकी अगोदरच तीन जागा बिनविरोध झालेल्या होत्या पाटील-जगताप गटाच्या व्यापारी मतदारसंघातून दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या तर सावंत गटाच्या हमाल/तोलार मतदारसंघातून एक जागा बिनविरोध झालेली होती. रविवारी १५ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती आज निकाला दिवशी बागल गटाच्या ८ जागा तर पाटील-जगताप गटाच्या ६ जागा निवडून आलेल्या असून शिंदे गटाची एक जागा निवडून आलेली आहे.

सध्याची परिस्थिती बघितली तर बागल गट ८ जागा
पाटील-जगताप गट ८ जागा
शिंदे गट १ जागा
सावंत गट १ जागा
असे बलाबल असून सत्ता स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या १० जागेचा मॕजिक आकडा गाठण्यासाठी बागल आणि पाटील-जगताप गटाला दोन जागा हव्या आहेत शिंदे-सावंत गटाकडे प्रत्येकी एक जागा असल्यामुळे सत्तेच्या चाव्या आता शिंदे-सावंत यांच्या हातात आहेत.