करमाळ्याच्या शेतकऱ्याने पेरू शेतीतून मिळवले नऊ लाखांचे उत्पन्न

vijay labde farmer karmala

टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली आणि हैद्राबादच्या बाजारपेठेमध्ये सध्या करमाळा तालुका येथील प्रगतशील शेतकरी विजय लबडे यांच्या व्हीएनआर जातीच्या पेरूचा बोलबाला आहे. हे पेरू चवीला स्वादिष्ट असून त्या एका पेरूचे वजन एक ते सव्वा किलो आहे. त्यामुळे सध्या दिल्ली आणि हैद्राबादच्या बाजारपेठेत करमाळ्याचा पेरू गाजत आहे. विशेष म्हणजे लबडे यांनी पेरू शेतीतून आतापर्यंत नऊ लाख रुपये कमावले आहेत.

आजपर्यंत लबडे यांनी केळी , कलिंगड ,कांदा, या पिकाचे भरघोस पीक घेतले असून २०१७ मध्ये आपल्या दोन एक्कर क्षेत्रात विशाखापट्टणम येथील नर्सरी मधून आणलेल्या व्हीएनआर जातीच्या पेरूच्या रोपांची लागवड केली. त्या दरम्यान लबडे यांनी अनेक अंतर्गत पिके घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले. यामध्ये प्रामुख्याने कांदा , कलिंगड , झेंडू , मिरची ह्या पिकांचे उत्पादन घेतले. विशेष करून पेरूवर त्यांनी लक्ष देऊन योग्य प्रकारे निगा राखली.

लबडे यांनी आतापर्यंत पेरूचे  १५ टन उत्त्पन्न घेतले असून दिल्ली, हैद्राबाद, पुणे बाजारपेठेत फळ विक्रीसाठी नेले. सुरवातीला १२० ते १५० रुपये दर मिळाला तर सध्या सरासरी ६० रुपये दर मिळत आहे. लबडे यांनी आतापर्यंत नऊ लाख रुपये कमावले असून २ एक्करमध्ये आणखी वीस टन उत्पादन निघून आकरा लाखाचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. सध्या त्यांच्या या पेरू शेतीचा प्रयोग हा परिसरातील शेतकऱ्यानंसाठी मार्गदर्शक ठरत आहे.