fbpx

माढ्यात आघाडीला आणखीन एक धक्का, माजी आमदारासह विद्यमान कॉंग्रेस नगराध्यक्ष भाजपात ?

vaibhavraje jagtap

करमाळा: माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार संजय शिंदे विरुद्ध भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यात सध्या जोरदार लढाई रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लढाई प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळे मतदारसंघातील नेत्यांना आपल्या गटात घेण्यासाठी जोरदार स्पर्धा होत आहे. यामध्ये आता करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, तसेच त्यांचे पुत्र नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

करमाळा तालुक्याच्या राजकारणात जगताप कुटुंबियांचे प्रस्थ आहे. दिवंगत नेते नामदेवराव जगताप हे सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे वजनदार नेतृत्व म्हणून ओळखले जात. तर जयवंतराव जगताप हे दोनवेळा करमाळ्याचे आमदार राहिलेले आहेत. त्यांचे पुत्र वैभवराजे जगताप हे करमाळा नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात केवळ करमाळा नगरपरिषदेत कॉंग्रेसची सत्ता आहे. आता जगताप पित्रा – पुत्र भाजपच्या वाटेवर असल्याने पंढरपूरमधील आ भारत भालके वगळता जिल्ह्याच्या राजकारणात कॉंग्रेसचा सुपडासाफ होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी बाजार समिती निवडणुकीत झालेल्या वादामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून हेतुपुरस्सर त्रास दिला जात असल्याची भावना जगताप समर्थकांमध्ये आहे. यावेळी स्वतः जयवंतराव जगताप यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, वैभावराजे जगताप हे कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आले असल्याने तांत्रिकदृष्ट्या जरी ते कॉंग्रेसमध्ये राहिले तरी मनाने भाजपवासी होणार असल्याची चर्चा करमाळ्यात सुरु आहे. तर जयवंतराव यांचे धाकटे सुपुत्र शंभूराजे जगताप यांनी आज भाजप प्रवेश केला आहे.

जर जगताप कुटुंबीय भाजपवासी झाले तर आघाडीला हा मोठा धक्का असणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांमध्ये माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपचे सध्याचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, कल्याणराव काळे, विजयराज डोंगरे आदी मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. यासर्व घडामोडींमुळे आघाडीचे उमेदवार संजय शिंदे हे एकतर्फी निवडणूक जिंकतील या शक्यतेला सुरुंग लगला आहे.

2 Comments

Click here to post a comment