करमाळा बाजार समिती : जगताप-पाटील गटाला प्रतिष्ठेची तर बागल गटासाठी अस्तित्वाची लढाई.

करमाळा : अनिता नितीन व्हटकर-करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीची चुरस वाढलेली असून, माजी आमदार जयवंतराव जगताप व शिवसेनेचे आमदार नारायण पाटिल यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई असेल. तर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल तसेच जि. प. अध्यक्ष संजय शिंदे गट यांना अस्तित्वाची लढाई असणार आहे. करमाळ्यात प्रथमच निवडणूक लढविणारे भाजप काय किमया करणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिलेले आहे.

निवडणुकीच्या आखाड्यात जगताप-पाटील हे युती करून निवडणूक उतरले असल्याने बागल गट आणि शिंदे गट यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरपर्यंत १८ जागांसाठी तब्बल १८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १४ अॉगस्ट रोजी अर्जांची छाननी होणार असून २९ अॉगस्टला उमेदवारी माघार घेण्याची अंतिम दिवस आहे. ९ सप्टेंबरला मतदान तर ११ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे.
सध्यातरी ही निवडणूक चौरंगी होणार असे बोलले जात आहे परंतु ही निवडणूक तिरंगी होणार की चौरंगी होणार हे ३० अॉगस्टला अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल. सध्याचे चित्र पहायला गेले तर पाटील-जगताप गटाला ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली असून बागल गट आणि शिंदे गट यांना अस्तित्वेची झालेली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप निवडणूकीच्या रिंगणात : दिपक चव्हाण