निवडणूकीच्या रिंगणात आता होऊ द्या खर्च….

करमाळा/गौरव मोरे– करमाळा बाजार समितीच्या निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असून सर्वच गटांकडून जोरदार तयारी सुरू झाल्यामुळे आता होऊ द्या खर्च अशी चर्चा सुरू आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासून करमाळा तालुक्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. ही निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असल्यामुळे सर्व गटांकडून मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे. करमाळा बाजार समितीची निवडणूक तिरंगी होत असून शिवसेनेचे आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप एकत्र निवडणूक लढवित आहेत. तसेच जि प अध्यक्ष संजय शिंदे आणि भाजप यांनी आघाडी केलेली आहे तर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल स्वतंत्र लढत असल्यामुळे ही निवडणूक तिरंगी झालेली आहे.

बाजार समिती निवडणूकीत प्रथमच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे ह्या निवडणूकीला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे कारण बरोबर एक वर्षानंतर विधानसभेची निवडणूक होणार असल्यामुळे प्रत्येक गट त्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसून येत आहे.

करमाळा बाजार समितीची १८ जागांसाठी निवडणूक होत असून याअगोदर व्यापारी मतदारसंघातून दोन जागा तर हमाल-तोलार मतदारसंघातून एक जागा बिनविरोध झालेली आहे. तर शेतकरी मतदारसंघातून १५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण १ लाख १४ हजार २०३ मतदार या निवडणूकीत मतदारांचा समावेश करण्यात आलेला आहे.

बाजार समिती निवडणूकीसाठी करमाळा तालुक्यातील वांगी, केम,कंदर, साडे,उमरड, हिसरे,झरे, जिंती, वाशिंबे, वीट, सावडी,पोथरे, राजूरी, जातेगाव, रावगाव अशा पंधरा गणांचा समावेश करण्यात आलेला आहे. सध्याचे चित्र पाहिले तर एकूण १२ जागांसाठी तिरंगी तर दोन जागांसाठी दुरंगी तसेच एका जागेसाठी चौरंगी लढत होत आहे.

सध्यातरी तालुक्यातील बाजार समिती साठी स्थानिक पातळीवर निवडणूक होत आहेत. सध्या पाटील गट, बागल गट, जगताप गट, शिंदे गट अशा प्रकारे गटाने निवडणूक लढविली जात आहे. या निवडणूकीत पाटील गट आणि जगताप गट एकत्र येऊन निवडणूक लढविणार असून बागल गट आणि शिंदे गट स्वबळावर लढणार असल्याचे चित्र आहे एकंदरीत ही निवडणूक पारंपारिक पाटील-बागल-जगताप-शिंदे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

२०१४ विधानसभेच्या निवडणूकीत नारायण पाटील यांनी बाजी मारल्यानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप आणि पाटील गट एकत्र येऊन गेल्या वर्षी झालेल्या करमाळा पंचायत समिती व ४ जिल्हा परिषदेचे गटही ताब्यात घेतलेले आहे याचा फायदा पाटील गट आणि जगताप गट यांना झालेला आहे.

राष्ट्रवादीचे नेत्या आणि बागल गटाच्या रश्मी बागल आणि जि. प चे अध्यक्ष संजय शिंदे यांना मागील विधानसभेपासून स्थानिक पातळीवर ही चांगलाच फटका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत बसला होता. याचा फायदा आमदार नारायण पाटील यांना झाला आहे.

जि प चे अध्यक्ष संजय शिंदे आगामी करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने तालुक्यातील जि.प व पंचायत समिती निवडणूकीत पूर्ण ताकतीने उतरले होते परंतु त्यांना यश मिळाले नाही. सध्या आगामी विधानसभा निवडणूक कुठल्याही परिस्थिती मध्ये लढविणार असल्यामुळे जि प अध्यक्ष संजय शिंदे संपूर्ण ताकतीने ही निवडणूक लढणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे.

करमाळा बाजार समिती निवडणूकीत आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप हे युती करून तर बागल गटांच्या नेत्या रश्मी बागल,आणि जि.प अध्यक्ष संजय शिंदे हे पूर्ण ताकतीने ही निवडणूक एकमेंकाच्याच विरोधात लढण्याची शक्यता आहे. हे चार ही गटांचे नेते आगामी विधानसभेची तयारी करताणा पाहायला मिळणार आहे.

यामुळे गावागावात राजकीय वातावरण तापत चालले आहे, बाजार समिती निवडणूकीत होऊ द्या खर्च असेच चित्र सध्या दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

यंदा प्रथमच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला असून शेतकरी मतदारसंघातून १५ जागांसाठी निवडणूक होत आहे.

बाजार समिती ठरविणार विधानसभेचा कौल.

विधानसभेच्या एक वर्ष अगोदर होत असलेली ही शेवटची निवडणूक असून बाजार समिती मध्ये सत्ता मिळवून याठिकाणी आगामी विधानसभेला आपली ताकद आणखीन बळकट करण्यासाठी आमदार नारायण प्रयत्नशील आहेत.

तर,येणारी विधानसभा निवडणूक सोपी जाण्यासाठी तिची मोर्चेबांधणी करण्यासाठी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल प्रयत्न करतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर दुसरी कडे जि प अध्यक्ष संजय शिंदे या निवडणूकीत कितपत यश मिळविणार हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.