लष्करी सामर्थ्याची आठवण करून देणारा हा दिवस: पंतप्रधान

वेबटीम : कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. देशासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी कारगिल युद्धात लढणाऱ्या शूरवीर जवानांची आणि देशाच्या लष्करी सामर्थ्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे, असंही मोदी म्हणाले.

सर्वोच्च पराक्रमांची गौरव गाथा

कारगिल युद्धाला आज १८ वर्षे झाली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. पंतप्रधान मोदी यांनी आज या दिनानिमित्त कारगिल युद्धातील शहीद जवानांना ट्विटद्वारे श्रद्धांजली वाहिली. आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करून देतं, असे प्रशंसोद्गार मोदींनी काढले. भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे, असं मोदींनी म्हटलं. दरम्यान, कारगिल युद्धातील शूरवीरांच्या सन्मानार्थ आज देशभरात लष्करातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील इंडिया गेट येथे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहतील.

भारत आणि पाकिस्तानमध्ये जुलै १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतात घुसखोरी केली होती. १८ हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्यानं धाडसानं शत्रूवर विजय मिळवला होता. ८ मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. २६ जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. अखेरच्या श्वासापर्यंत धैर्यानं लढा देत भारतीय सैन्यानं कारगिल युद्ध जिंकले.

 

You might also like
Comments
Loading...