करणी सेना,अखिल भारतीय क्षत्रिय महासभा आक्रमक

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही पद्मावत ला विरोध सुरूच

पुणे – ‘पद्मावत’ सिनेमा जर प्रदर्शित झाला तर जी काही तोडफोड होईल त्याला सिनेमागृहाचे मालक आणि प्रदर्शित करण्यासाठी परवानगी देणारेच जबाबदार असतील असा इशारा अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने देण्यात आला आहे. येत्या २२ जानेवारी रोजी पद्मावत या सिनेमाला विरोध करण्यासाठी पुण्यात मोर्च्याचे आयोजन करण्यात आलं आहे .शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्च्यात करणी सेना तसेच अनेक समविचारी संघटना सहभागी होणार असल्याचं अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या दिनेशसिंह परदेशी यांनी ‘महाराष्ट्र देशा’ बरोबर बोलताना दिली .

दरम्यान चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन भन्साळींनी काल (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने सर्व राज्यांना ‘पद्मावत’ प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 25 जानेवारी या नियोजित वेळेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘पद्मावत’ला यापूर्वी विविध राजपूत संघटनांनी केलेल्या विरोधानंतर चित्रपटाचे नाव बदलण्यात आले. तरीदेखील हरियाना, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.