बागल गटाला धक्का, दिग्विजय बागलांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द

करमाळा : करमाळ्यातील पंचायत समितीवरचा जगताप गटाचा डौलाने फडकणारा झेंडा ज्या बगल गटाने हटविला त्या बागल गटाला मोठा धक्का बसला आहे. दिग्विजय बागल व जगताप गटाचे समर्थक सदाशिव पाटील या दोघांचे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद राज्याचे पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी अपात्र ठरवत रद्द करण्याचा निकाल दिला आहे. दिग्विजय बागल यांच्या संचालक पदावर गंडांतर आल्याने बागल गटाची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत दिग्विजय बागल यांनी पोथरे शेतकरी गटातून बाजार समितीच्या संचालकपदाची निवडणूक लढवून जिंकली होती. या प्रकरणी प्रतिस्पर्धी उमेदवार शंभूराजे जगताप यांनी राज्याचे पणन संचालक, पुणे यांच्याकडे दिग्विजय बागल यांच्या निवडीच्या विरोधात त्यांच्या पत्नी प्रियंका बागल यांच्या नावे व्यापार अनुज्ञाप्ती असल्याने त्यांना शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व म्हणून काम करता येत नाही असे अपिल दाखल केले होते.

पणन संचालकांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत दिग्विजय बागल यांच्या पत्नीच्या नावे बाजार समितीमध्ये अनुज्ञाप्ती असल्याचे सिद्ध झाल्याने दिग्विजय बागल यांचे शेतकरी गटातील संचालकपदावर अपात्रता आणून पद रद्द करण्याचा निकाल दिला आहे.