कराची स्वीट्स : ‘मुख्यमंत्र्यांनी तमाशा बघू नये,’ नितीन नांदगांवकर यांच्यावर संजय निरुपम यांची टीका

नांदगावकर

मुंबई : मुंबईत कराची नावाने सुरू असणाऱ्या उद्योगांबद्दल शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे. बांद्रा इथल्या ‘कराची स्वीट्स’ या दुकानावर शिवसेनेच्या वतीने आक्षेप घेतलाय तर याच परिसरातील ‘कराची बेकरी’ या नावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेत आज आंदोलनही केलं. कराची नावाने सेना आणि मनसे या दोघांमध्ये आता श्रेय वादाचं राजकारण पेटले आहे.

यावरच शिवसेनेचे नेते नितीन नांदगांवकर यांनी शहरातील कराची स्वीट्स दुकानाचे नाव बदलण्याची मागणी केली होती. देशातील सैनिकांचा कराची स्वीट्स या नावामुळे अपमान होत असल्याचे नितीन नांदगांवकर यांचे म्हणणे होते. नांदगांवकर यांनी त्यासाठी कराची स्वीट्सच्या दुकानात जाऊन तेथील मालकांना याबाबत निवेदन देत समज दिली होती.

यासंदर्भात काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हणतात देशातील चायनीज हॉटेलचा चीनशी काडीमात्र संबंध नाही, त्याचबरोबर पाकिस्तानशी वांद्रे येथील कराची स्वीट्सचे कोणतेही नाते नाही. शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना हे सत्य कधी समजणार? ७० वर्ष जुन्या दुकानाचे नाव बदलण्याची धमकी दिली जाते, हे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी तमाशा बघू नये, त्यांची रक्षा करावी.

अशातच, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून बेकरीचे नाव बदलण्याची भूमिका ही पक्षाची अधिकृत नसल्याचं म्हटलं आहे. ‘कराची बेकरी आणि कराची स्वीटस 60 वर्षापासून मुंबई सह देशात आहेत. तयांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भुमिका नाही.’ असा खुलासा संजय राऊत यांनी केला.

महत्वाच्या बातम्या