कोरोनाच्या संकटात कानिफनाथ देवस्थानच्यावतीने 25 कुटुंबांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सासवड : देशावर आणि राज्यावर कोरोनाचे (COVID19) मोठे संकट आले आहे. याचा सर्वाधिक फटका हा मजूर वर्गाला बसला आहे. रोजनदारी बंद झाल्याने अनेक मुजरांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे खाण्या पिण्याचे हाल होत आहे. मात्र अशा बिकट परिस्थितीत अनेक सेवा भावी संस्थांनी मजूर वर्गासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

पुरंदर तालुक्यात देखील असा मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने बोपगाव कानिफनाथ देवस्थान पंचायत कमिटीच्यावतीने आज मजूर आणि गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी देवस्थानच्यावतीने 5 किलो गहू – 10 किलो तांदूळ, 3 किलो डाळ आणि खाद्य तेलाचा पुडा प्रत्येक नागरिकाला देण्यात आला. या मदतीचा लाभ 25 कुटुंबांना मिळाला. सदर मदत ही पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आली. यावेळी नाईब तहसीलदार उत्तम बडे, माजी नगरसेवक संतोष गिरमे, देवस्थानचे संचालक प्रकाश फडतरे, दीपक फडतरे, राजेंद्र निंबाळकर, अशोक पेटकर, भाऊसाहेब ढमढेरे, ताजुउद्दीन शेख आदि. उपस्थित होते.

दरम्यान तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याने पुरंदर सध्याच्या घडीला कोरोनापासून सुरक्षित आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. तसेच विदेशातून आलेल्या आणि मुंबई – पुण्याहून आलेल्या नागरिकांना चाचण्या करून 14 दिवस होम क्वारेंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.