बारामती शहर वगळता उर्वरित मतदारसंघ विकासापासून वंचितचं : कांचन कुल

blank

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून मतदानाच्या तारखा आत जवळ येऊ लागल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी प्रचाराचा चांगलाच धडाका लावला आहे. बारामती लोकसभा मतदार संघात देखील युती आणि आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी गाव निहाय प्रचाराला सुरवात केली आहे. शुक्रवारी युतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी प्रचारानिमित्त जेजुरी गावाला आणि देवस्थानाला भेट दिली. यावेळी पदयात्राकाढून स्थानिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी कांचन कुल यांनी बारामती मतदारसंघातील पवारांच्या तुटपुंज्या विकासावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, बारामती शहर आणि आजूबाजूचा परिसर वगळता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विकास झालेला नाही. तसेच अनेक गावं ही विकासापासून वंचित आहेत. या परिसरातील मोठे प्रश्न अजून प्रलंबित असून त्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे आता या साऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तसेच माझ्या उमेदवारी मागे जनतेचा खूप मोठा आग्रह होता.असे कांचन कुल यावेळी म्हणाल्या.

तसेच कांचन कुल यांनी विमानतळ विरोधी गावांवर देखील भाष्य केले. त्या म्हणाल्या की, पुरंदर मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले पाहिजे पण त्याआधी बाधित शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना विश्वासात देखील घेतले पाहीजे. त्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेवून सरकारकडे योग्य पद्धतीने पाठपुरावा केला पाहिजे.

दरम्यान बारामती मतदार संघात रंगतदार लढत होणार असून युती आणि आघाडीचे दोन्ही उमेदवार एकमेकांना तोडीस तोड आहेत. सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध युतीकडून भाजपच्या कांचन कुल उतरल्या आहेत. कांचन कुल यांनी प्रचाराचा चांगलाच जोर पकडला आहे. तर यावेळी पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा फडकवणारचं असा निर्धार त्यांनी केला आहे.