मिल कंपाऊड मधील भीषण आगीची चौकशी द्रुतगती न्यायालयात करावी – विनोद तावडे

मुंबई: ज्या पध्दतीने कोपर्डी खटल्याचा निकाल द्रुतगती न्यायालयाने देऊन दोषींना शिक्षा सुनावली, त्याचपध्दतीने या घटनेतील दोषींविरुध्द द्रुतगती न्यायालयात खटला चालवून यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तींविरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि या दुर्घटनेत जीव गमाविलेल्या निष्पापांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती विनोद तावडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊड मधील भीषण अग्नितांडवात १४ निष्पाप व्यक्तींचा होरपळून मृत्यु झाला. ही दुर्घटना अतिशय गंभीर असून ज्या पब आणि रेस्टॉरंटमधील निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली, त्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुध्द कारवाई झालीच पाहिजे, परंतु या पब आणि रेस्टॉरंटला नियमांचे उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुध्द तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई झालीच पाहिजे पण नियम डावलून केवळ राजकीय प्रभावाखाली परवानगी देण्यात आली असेल तर त्या राजकीय व्यक्तींचे नाव उघड झाले पाहिजे व त्यांच्याविरुध्दही समान न्यायाने कारवाई झाली पाहिजे, असेही विनोद तावडे यांनी नमूद केले आहे.

You might also like
Comments
Loading...