कल्पना गिरी खून प्रकरण : तपासात प्रगती नसल्याने न्यायालयाकडून नाराजी व्यक्‍त

kalpana giri latur

लातूर : लातुरातील कल्पना गिरी खून प्रकरण सीबीआयकडे वर्ग होऊन वर्ष उलटले तरी याच्या तपासात अपेक्षित प्रगती होत नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 18 नोव्हेंबरला होणार आहे. या प्रकरणात नेमकी काय प्रगती झाली आहे. हे सीबीयच्या तपास अधिका-यांना सुनावणीत सांगता आले नाही. त्यामुळे लातुरच्या जिल्हा न्यायालयाने सीबीआयवर नाराजी व्यक्त करुन प्रगती अहवाल सादर करण्याच्या तपास अधिका-यांना सूचना दिल्या.

कल्पना गिरी बलात्कार आणि खून प्रकरणाचा तपास वर्षभरापूर्वी सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयचे उपाधिक्षक एमके पाठक हे करीत आहेत. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात पार पडली.

यावेळी न्यायालयाने या प्रकरणाचा नेमका काय तपास केला, आरोपीला मिळालेल्या नार्को टेस्टच्या परवानगीनंतर त्याची नार्को टेस्ट का करण्यात आली नाही, एका आरोपीच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली, त्याचे पुढे काय झाले? या प्रकरणात सीबीआयच्या वतीने कोणत्या वकिलाची नियुक्ती करण्यात आली असे अनेक प्रश्न यावेळी तपास अधिका-यांना न्यायालयाने विचारले.

परंतु कुठल्याच प्रश्न उत्तर ठोसपणे न मिळाल्याने संतापलेल्या न्यायालयाने तपास कामांवर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाच्या तपासाच्या प्रगतीचा अहवाल न्यायालयास सादर करण्याच्या सूचना देऊनही सीबीआयकडून ते सादर का करण्यात येत नाही यावरुन विचारणा करण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे.