जत्रेत चोरी करणाऱ्या नगरसेवकाच्या पत्नीला अटक

crime-1

सोलापूर: जत्रेत केलेल्या चोरीच्या प्रकरणात नगरसेवकाच्या पत्नीसह तिघांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात तिघांना सोलापुरात आणून कबुलीजबाबाप्रमाणे चौकशी केली असता शहरातील तीन सराफ देखील यात सहभागी असल्याचं समोर आलं आहे. या सराफांकडून २० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

सिमोगा जिल्ह्यात (कर्नाटक) श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या जत्रेच्या दरम्यान गर्दीचा लाभ उठवून तिमव्वा लक्ष्मण जाधव, मीना जाधव आणि उषा खांडेकर या महिलांना दागिने चोरताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे कर्नाटक पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आजवर त्यांनी केलेले २४ गुन्हे उघडकीस आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून न्यायालयामार्फत पोलीस कोठडी मिळवली होती.संबंधित तिमव्वा लक्ष्मण जाधव ही नगरसेवक लक्ष्मण जाधव यांची पत्नी असल्याचे सांगण्यात आले.

तीन सराफांचा सहभाग-
या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने दावणगिरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बसवराजू आपल्या सहकाऱ्यांसह तिन्ही आरोपींना घेऊन सोलापुरात आले होते. रविवारी व सोमवारी दोन दिवस त्यांची कसून चौकशी करण्यात आली. चोरलेला ऐवज कोठे ठेवला, कोणाला विकला यासंबंधी येथील गुन्हे शाखेच्या सहकार्याने चौकशी करण्यात आली. या प्रकरणात शहरातील ज्या तीन सराफांना दागिने विकले होते त्यांच्याकडून २० तोळे दागिने जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.