‘बजरंगबलीच्या कृपेनं जिंकलात, शाळा मदरशांमध्ये हनुमान चालीसा शिकवा’

नवी दिल्ली : दिल्लीकरांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपा व काँग्रेसला सपशेल नाकारत आम आदमी पार्टीच्या बाजूने कौल दिला. विधानसभेच्या ७० जागांपैकी ‘आप’ने ६२ जागांवर विजय मिळवला. आता अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांसह भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनीही अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. तसेच, अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी हनुमानजींनी दिल्लीवर कृपा केली आहे, असे म्हटले होते. यावरून कैलाश विजयवर्गीय यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला.

दिल्लीतील शाळा आणि मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकविण्याचा सल्ला कैलाश विजयवर्गीय यांनी केजरीवाल यांना दिला आहे. यासंदर्भात विजयवर्गीय यांनी ट्विट देखील केले आहे. ट्विट मध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, ‘निश्चितच जे हनुमानाला शरण येतात, त्यांना आशीर्वाद मिळतो. दिल्लीतील सर्व शाळा, मदरसा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हनुमान चालिसा शिकविण्याची आता वेळ आली आहे. याबरोबर, त्यांनी लिहिले आहे की, बजरंगबलीच्या कृपेने आता दिल्लीवासियांची मुलं वंचित का राहतील? असं ट्विट त्यांनी केलं आहे.