म्युकरमायकोसिसवर मोफत उपचाराच्या फक्त घोषणाच, शासन निर्णय कधी होणार?

कोल्हापूर : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण याबाबत अद्याप शासन आदेश निघालेला नाही. त्यामुळे म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना या योजनेत समावेश होत नाही. त्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

याबाबत राजू शेट्टी यांनी ट्वीट करून त्यांचा संताप व्यक्त केला आहे. ‘कोरोना नंतर होणाऱ्या Mucormycosis या आजारावरील उपचार जनआरोग्य योजने अंतर्गत होईल अशी घोषणा आरोग्य मंत्र्यांनी करून 4 दिवस झाले. आद्यप शासन निर्णय झालेला नाही.खासगी दवाखाने उपचारासाठी 10 लाख पॅकेजची मागणी करतात. Ambisome या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे,काळा बाजार होतोय. सर्वसामान्य, गोरगरीब आपला जीव गमावतायत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात 4 रुग्णांनी जीव गमावला,5 रुग्ण अत्यावस्थ आहेत.शासन निर्णय होणार कधी? अजून किती लोकांचा बळी घेणार आहात?’, असे प्रश्न राजू शेट्टी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला विचारले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP