स्मार्ट सिटी बसच्या ग्रामीण फेऱ्यांवरुन एसटी आणि सिटी प्रशासनात जुंपली

smart city bus

औरंगाबाद : शासन आदेशानुसार स्मार्ट सिटी बससेवेला शहरापासून २० किलोमीटरअंतरापर्यंत धावण्यास मुभा आहे. मात्र या शासन आदेशाला न जुमानता एसटी महामंडळाने स्मार्ट सिटी बससेवा ग्रामीण भागात सुरू करण्यात खोडा घातला आहे. राज्य परिवहन मंडळाने परवानगी दिलेली नाही. आपसात स्पर्धा करुन काय फायदा? असा सवाल महामंडळाने उपस्थित केला आहे. यामुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील फुलंब्री, बिडकीन, चितेगाव, वेरूळपर्यंत स्मार्ट बससेवा सुरू झालेली नाही.

सध्या ५० बस शहरातून २० मार्गांवर धावत आहेत. यातच मागील अनेक दिवसांपासून शहरापासून २० किलोमीटरच्या आत असलेल्या करमाड, बिडकीन, चितेगाव, फुलंब्री, वेरूळपर्यंत स्मार्ट बससेवा सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. मात्र यात एसटी महामंडळाने परवानगी नसल्याचे सांगत खोडा घातला आहे. महामंडळाने याविषयी सांगितले, ‘ ग्रामीण भागात महामंडळाच्या रोजच्या ४५० वर फेऱ्या आहेत. स्मार्ट सिटी आणि महामंडळाच्या बसेस मध्ये स्पर्धा होऊन लोकांचेच नुकसान होईल ‘. स्मार्ट सिटी बस व्यवस्थापनाने शासन निर्देशाचा हवाला दिला आहे. त्यानुसार शहरापासून २० किलोमीटरपर्यंत सिटी बससेवेला मुभा आहे, त्यास तुमच्या एनओसीची गरज नाही. नव्हे तसा अधिकारच महामंडळाला नाही, असे खरमरीत उत्तर दिले.

यानंतर ग्रामीण भागात स्मार्ट सिटी बससेवा सुरू करण्यासंदर्भात अनेक बैठकाही झाल्या. मात्र आजवर महामंडळाने ग्रामीण भागात आमची सेवा असल्याचे सांगत आडकाठी कायम ठेवली आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात अद्याप स्मार्ट सिटी बससेवा सुरू झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यास स्मार्ट बस विभागाचे मुख्य ऑपरेशन व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी देखील दुजोरा दिला.

महत्वाच्या बातम्या