कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील संपादीत जमिनीचा मावेजा मिळेना, शेतकऱ्यांच्या कॅनॉलमध्ये उड्या

farmer

उस्मानाबाद : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील संपादीत जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी आंबी येथील शेतकऱ्यांनी कॅनॉलमध्ये उड्या मारत आंदोलन केले. गेल्या अकरा वर्षांपूर्वी भुम तालुक्यातील आंबी शिवारातील जवळपास १०० एकर जमीन कॅनॉलसाठी अधिग्रहित करण्यात आली होती. मात्र या शेतकऱ्यांना अद्यापही याचा मावेजा मिळाला नाही. शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा त्यांना देण्यात यावा, अशी मागणी या वेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली.

या संदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने वारंवार पाठपुरवा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्येक वेळी केवळ आश्वासन देण्यात येते. त्यामुळे शेतऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सातत्याने पाठपुरावा, आंदोलने करूनही प्रशासन त्यांची दखल घेत नसल्याने, आक्रमक होत या शेतकऱ्यांनी  जलसमाधी घेण्याचा पवित्रा घेतला. आणि कॅनॉलच्या पाण्यामध्ये शेतकऱ्यांनी उड्या मारल्या.

या सर्वामुळे आंदोलनस्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आंदोलनस्थळी आपत्ती व्यवस्थापन चमूसह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर या शेतकऱ्यांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. मात्र, तीन महिन्यांच्या आत आमचा हक्काचा पैसा मिळाला नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या