औरंगाबादेत जम्बो लसीकरण मोहीम संकटात! तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक

लसीकरण.

औरंगाबाद : शहरात १६ जानेवारी पासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून आजवर पहिल्या टप्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना लस देण्यात आली. दुसर्‍या टप्यात फ्रंटलाईन वर्कर आणि तिसर्‍या टप्यात ६० वर्षांवरील व ज्यांचे वय ४५ पेक्षा जास्त आहे, मात्र त्यांना गंभीर आजार आहेत अशा लाभार्थ्यांना लस देण्यास आली.

यानंतर लसीकरणाची गती वाढवण्याचे शासनाने आदेश दिले. त्यानुसार मनपा प्रशासनाने जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. सध्या तीन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक आहे. तोवर लसीचा साठा मिळाला नाहीतर पालिकेची जम्बो लसीकरण मोहीम रविवारपासून संकटात सापडण्याच्या मार्गावर आहे.

पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण व मास्क वापरणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे पालिकेने सुरुवातीपासून लसीकरण मोहिम प्रभावीपणे सुरू केली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, जेष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील आजारी नागरिक आणि आता सरसकट ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

लसीकरणाला नागरिकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. लस घेतलेल्या नागरिकांना कोरोना सौम्य होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी दर आठवडयाला एक लाख लसींच्या साठयाची मागणी केली जात आहे. मात्र त्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत नाही. सध्या शहरात तीन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक आहे.

मागील आठवड्यात शहराला ६० हजार लसी मिळाल्या होत्या. त्यापैकी आता केवळ १५ ते २० हजार लसीचा साठा शिल्लक आहे. तीन दिवसांपासून ११५ वॉर्डात लसीकरण मोहीम सुरू आहे. ४५ केंद्रावर देखील लसीकरण सुरू आहे. त्यामुळे तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. लसीचा साठा उपलब्ध झाला नाहीतर रविवारी होणारे लसीकरण संकटात येण्याची भिती डॉ. नीता पाडळकर यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या