पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे – रामदास आठवले

रामदास आठवले

मुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे पत्रकारांना लेखन स्वातंत्र्याचा अधिकार आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाही व्यवस्थेवरील हल्ला ठरतो. त्यामुळे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे मत व्यक्त करून पत्रकारांच्या संरक्षणासाठी सर्व राज्यसरकारांनी कायदा करावा. देशभरातील पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायद्याची गरज असून त्यासाठी आपण केंद्रात प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

डोसा जिल्हयातील बसवा गावात ऑल इंडिया प्रेस परिषद च्या वतीने राष्ट्रीय प्रतिभा सन्मान समारोह आयोजित करण्यात आला होता. त्यात ना रामदासआठवले यांच्या हस्ते देशभरातील शंभर प्रतिभावंत पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया च्या क्षेत्रातील पत्रकारांची मोठया संख्येनेउपस्थिती होती. यावेळी विचारमंचावर गोपाळ डेंगवाल, राधामोहन सिंह, महेंद्रदास महाराज, राजस्थानी अभिनेत्री नेहाश्री आणि सतीश कातरवाला आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारांच्या विचारस्वातंत्र्यावर हल्ला होता कामा नये. पत्रकारांमुळेच लोकशाही मजबूत आणि प्रगल्भ होत आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी पत्रकारांची लेखणी राहिल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व आपले घडले असे कृतज्ञ उद्गार ना रामदास आठवले यांनी यावेळी उत्स्फूर्तपणे व्यक्त केले.

पत्रकार संरक्षण कायदा करण्यात यावा अशीमागणी पुढे आली आहे त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना दिले.