Breaking : पत्रकार जे डे हत्या प्रकरणी छोटा राजन दोषी, जिग्ना वोरा निर्दोष

blank

टीम महाराष्ट्र देशा- पत्रकार जे. डे. यांच्या हत्येच्या खटल्याचा आज निकाल लागला आहे. अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनसह 9 आरोपी दोषी ठरवण्यात आले आहेत. छोटा राजन हा या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. तर पोल्सन जोसेफ आणि पत्रकार जिग्ना व्होरा यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. विशेष मोक्का न्यायालयानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून याविषयीची सुनावणी पूर्ण केल्यानंतर आज हा निकाल सुनावण्यात आला आहे.

छोटा राजन याच्यासहित सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोडीया हे नऊ जण दोषी सिद्ध झाले आहेत. दरम्यान फिर्यादी वकिलांनी समाजातील चौथ्या स्तंभावर हल्ला झाला असल्या कारणाने हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण ग्राह्य धरत जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

11 जून 2011 रोजी डे दुचाकीवरून पवई येथील निवासस्थानी जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. पाच गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेले डे यांचा हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला. मुंबई गुन्हे शाखेने सखोल तपास करून डे यांची हत्या संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनच्या इशाऱ्यावरून घडल्याचे स्पष्ट केले.

डे यांच्यावर गोळ्या झाडणारा सतीश थंगप्पन जोसेफ ऊर्फ सतीश काल्या आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून या हत्याकांडासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केलेल्या, सहभाग घेतलेल्या एकूण 12 आरोपींना मकोकान्वये गजाआड करण्यात आले होते. यामध्ये पत्रकार जिग्ना वोराचाही समावेश होता.

दरम्यान, सीबीआयच्या म्हणण्यानुसार, डे यांनी लिहिलेल्या एका पुस्तकामुळे राजन अस्वस्थ होता आणि त्यात डे यांना मारण्यासाठी जिग्ना वोरा हिने चिथावणी दिली. त्यामुळे छोटा राजननं डे यांना मारण्यासाठी काही गुंडांना सुपारी दिली.