पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर : परिवर्तनवादी पत्रकारिताचे अग्रदूत

Journalist Dr. Babasaheb Ambedkar

प्रा. डॉ.सुधीर गव्हाणे – मराठी पत्रकारितेच्या इतिहासात मुख्यप्रवाह तीन राहिले आहेत. एक राजकीय स्वातंत्र्याची पत्रकारिता, दुसरी समाज सुधारणेची पत्रकारिता आणि तिसरी मानवमुक्तीची पत्रकारिता ! राजकीय स्वातंत्र्याची पत्रकारिता लोकमान्य टिऴकांच्या नेतृत्वाखाली जोमाने वाढली व या पत्रकारितेने इंग्रजांशी ज़बरदस्त लढ़ा दिला तर राजा राम मोहन रॉय , अागरकर आदिंनी समाजसुधारणेची पत्रकारिता केली आणि समाजाला नवी दिशा दिली. बहुजन जागरणाची आणि मानवमुक्तीची पत्रकारिता मात्र म. फुलेंच्या नेतृत्वाखालील सत्यशोधक पत्रकारितेने व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकरी पत्रकारितेने केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी पत्रकारिता केली ती समाज बदलाची आणि बंडखेार वृत्तीची होती. प्रस्थापित विषमतावादी चातूर्वर्ण्य व्यवस्थेला भूकंपाचे धक्के देऊन तिला नेस्तनाबूत करणारी क्रांतिकारी पत्रकारिता बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. ती त्या अर्थाने मानवमुक्तीची पत्रकारिता होती. सारी मुख्यप्रवाहातील पत्रे विरोधाची विषारी आग ओकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला तोल न जाऊ देता निर्भयपणे पण अतिशय सुसंस्कृत पध्दतीने परखड लेखन करून विरोधी तथाकथित पत्र महर्षिंना नामोहरण केले. ज्ञानसंपन्न वादविवाद करून नव्या गुणवान , मानवताप्रधान नि सुसंस्कृत बुध्दिवादी पत्रकारितेचा पायंडा पाडला.
बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेचे तीन वर्ग पाडताना दिसतात.
एक “स्वहितकारी “पत्रकारिता , जी स्वार्थाने ग्रासलेली होती. फक्त आपला फ़ायदा बघणारी पत्रकारिता. हिला आपण स्वलाभवादी पत्रकारिता म्हणता येईल. स्वहितकारी पाहताना जनहिताला मुठमाती देण्यासाठी अशी पत्रकारिता मागेपुढे पहात नाही. अशाच पत्रकारितेचा आज सुऴसुऴाट झाला आहे. दुसरा वर्ग बाबासाहेब आंबेडकर यांनी केला तो “स्वजनहितकारी “पत्रकारितेचा , जी स्वत:च्या जातीय व धार्मिक हिताकडे पाहण्यात दंग होती. ही पत्रकारिता पक्षपाती होती व आजही आहे. डॉ. आंबेडकर यांनी तिसरा वर्ग केला तो स्वतंत्र व सर्वजनहितकारी पत्रकारितेचा! सर्वांची हित पाहणारी नि गरीबांची बाज़ू घेऊन लढणारी पत्रकारिता ही जनहितैषि होय. आजची पत्रकारिता “सर्वजनहितकारी ” किती आहे नि धनवान नि बलवानांच्या आहारी किती आहे हे सांगायला नको. जिथे शोषण आहे तिथे मानवता नांदू शकत नाहीं. शांतीही असू शकत नाहीं. मानवमुक्तीची पत्रकारिता करून डॉ. आंबेडकर पोटभरू नि गल्लाभरू पत्रकारितेला आव्हान देत होते. बुलंद शब्दात मानवतेचा नि शांततेचा मंत्र गात होते. मूकनायक , बहिष्कृत भारत , जनता, समता आणि प्रबुध्द भारत या पत्रांद्वारे बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेचा पुरस्कार करणारी पत्रकारिता धिक्कारली आणि मानवतावादी नि परिवर्तनवादी पत्रकारिता केली. त्यांची शैली , लेखन हे प्रखर बुध्दिवादी नि तर्कसंगत आणि सभ्यतेची कास धरणारी होती. ती ज्ञानधर्मी होती आणि जातधर्मी अजिबात नव्हती. या पत्रातील लेखन बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला समता लढ़ा वेगात असताना केले आहे व त्याला त्यामुऴे वेगऴीच धार आली आहे. एकाद्या लढवय्यावर सारे विरोधक तुटून पडावे आणि त्याने एकाकी लढत देऊन विजय मिऴवावा असे त्यांचे पत्रकारितेतील काम होते. पत्रकारितेच्या इतिहासात आरंभी बाबासाहेब आंबेडकर यांची दखल घेतली गेली नाहीं , पण सत्य दडपता येत नाहीं हेच आता लक्षात आले आहे. कालजयी पत्रकारिता ही मानवतेचा लढ़ा देते. धंदेवाईक पत्रकारिता क्षणभंगूर असते हेच खरे. या परंपरेचे पालन करणारी पत्रकारिता आज अतिशय गरजेची आहे. मूल्यधर्मी, समताधर्मी नि राष्ट्रधर्मी पत्रकारिता करून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवू शकतो. बाज़ारू नव्हे तर लढाऊ पत्रकारितेचा आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. ही विझत चाललेली परंपरा जिवंत करणं नि जनहिताची पत्रकारिता करणं हेच पत्रकारांचं काम आहे. नाही का ? नव्यापिढीतही असे लढवय्ये पत्रकार दिसताहेत हेही चांगले लक्षण मानलं पाहिजे.

लेखक-  PROF. DR. SUDHIR GAVHANE, Media& Higher Education Expert , Retired University teacher with 34 years experience at BAMU AURANGABAD [MAHARASHTRA] INDIA. Now Dean at MIT-WPU Pune.Loading…


Loading…

Loading...