fbpx

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पोलिस उपनिरिक्षकाच्याविरोधात हक्कभंग…

Jitendra-Awhad

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना श्रीगोंदयाच्या पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव याने दारुच्या नशेत शिवीगाळ केल्याने त्याच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहात हक्कभंग दाखल केला.

दरम्यान त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा या मागणीसाठी विरोधीपक्षाचे आणि सत्ताधारी शिवसेनेचे आमदार वेलमध्ये उतरले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे सभेचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकुब करण्यात आले.

आज महाराष्ट्रातील आमदारांचा अपमान केला जात आहे. हक्कभंग आमचा अधिकार असून कामकाज पत्रिकेत त्याचा उल्लेख केला जात नाही अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी करुन ८ जून २०१८ रोजी भिमराव नलगेच्या घरी जावून श्रीगोंदाचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी दारूच्या नशेत हंगामा केला तसेच आमदार छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याचे स्पष्ट करत महावीर जाधव यांच्याविरोधात आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करत आहोत तो हक्कभंग समिती पुढे न्यावा असे सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याचा हक्कभंग प्रस्ताव आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दाखल करताच सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधारी शिवसेना आमदारांनी त्या अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी जोरदार घोषणाबाजी केली. वेलमध्ये उतरत आमदारांनी त्या अधिकाऱ्याला तात्काळ अटक करा अशी मागणी केली.

आज अधिकारी मुजोर झाले आहेत. छगन भुजबळ हे सभागृहाचे मोठे नेते आहेत त्यांच्याविषयी शिवीगाळ कळणे योग्य नाही. शिवीगाळ करण्याची अधिकाऱ्यांची हिम्मत कशी होते ? अशा मुजोर अधिकाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा. महावीर जाधवला तात्काळ आजच्या आज निलंबित करा अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान या घटनेनंतर विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना एवढी कसली मस्ती आली आहे ? असा संतप्त सवाल करतानाच ज्यावेळी त्यांच्यावर अन्याय होतो तेव्हा ते सर्वजण एकवटतात आणि संपावर जातात तो त्यांचा अधिकार आहे. पण आमच्यावर अन्याय होत आहे त्याकडेही गांभिर्याने बघायला हवे. छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत. उपमुख्यमंत्री, मुंबईचे महापौर राहिले आहेत. त्यांच्या विषयी बोलणाऱ्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा अशी मागणी अजितदादांनी सभागृहात केली.

मी त्या गावाला कधी गेलो नाही, त्या अधिकाऱ्यांना मी ओळखत नाही. ज्यांच्या घरात तो शिरला त्यांना मी ओळखत नाही. तरी माझ्याविषयी शिवराळ भाषेत वक्तव्य केले गेले अशी माहिती आमदार छगन भुजबळ यांनी सभागृहात दिली.

त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव याला तात्काळ निलंबित करण्यात यावे यासाठी विरोधकांनी सभागृहातच आंदोलन केल्यामुळे अध्यक्षांसमोर पेच निर्माण झाला त्यामुळे त्यांनी आजच्या आज त्या पोलिस उपनिरिक्षकाला निलंबित करा अशी सूचना केली मात्र याने विरोधकांचे समाधान झाले नाही त्यांनी आंदोलन सुरुच ठेवले त्यामुळे सभागृहाचे कामकाज अध्यक्षांनी १५ मिनिटासाठी तहकुब केले. त्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाले त्यावेळी सर्वच पक्षाच्या आमदारांनी हा मुद्दा उचलून धरला आणि त्यावर आपले विचार सभागृहात मांडले.

दरम्यान यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा विषय विशेष हक्कभंग समितीकडे पाठवला जाईल आणि यावर उदया निर्णय दिला जाईल असे स्पष्ट केले. मात्र तरीसुध्दा सभागृहामध्ये गोंधळ सुरुच राहिल्यानेपुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले.

भुजबळांच्या तब्बेतीचे १२ वाजले; सरकार किती अवहेलना करणार?