मजुरांचा खर्च केंद्रानं केल्याच्या भाजपाच्या दाव्याला जितेंद्र आव्हाडांनी दिलं उत्तर

jitendra avhad

मुंबई : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सर्वपातळीवर उपाययोजना सुरु आहे. तर दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातही स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थलांतरित मजुरांचा खर्च केंद्र सरकारनं उचलला असल्याचा दावा पत्रकार परिषदेतून केला होता.

याचाच धागा पकडत राज्य सरकारनं पत्रकार परिषद घेऊन सर्व खर्च राज्यानं केल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही,’ अशा शब्दात आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.

ट्विट करत आव्हाड म्हणतात, ‘केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च सरकारी वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या रेल्वेचे सगळे पैसे हे महाराष्ट्र सरकारनं दिले. त्यामध्ये केंद्र सरकारनं कुठलाही पैसा खर्च केला नाही,’ असं आव्हाड म्हणाले.

दरम्यान, ‘भाजपा आतापर्यंत महाराष्ट्रातील लोकांना मुर्ख बनवत आली आहे. हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरकारी वकिलांच्या विधानावरून स्पष्ट होतं. हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही,” असं आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं आहे.