आधी कोरोना किटची निर्मिती केली, मग बाळाला दिला जन्म; कर्तव्यदक्ष डॉक्टरांना आव्हाडांचा सलाम

मुंबई : पुण्यातल्या कंपनीनं 6 आठवड्यात संशोधन करून 100 टक्के स्वदेशी बनावटीची किट तयार केली आहेत. विशेष म्हणजे हे किट्स तयार करण्यासाठी महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांचं अमूल्य योगदान आहे. तसेच प्रसुतीच्या काही तास आधीपर्यंत कोरोना निदानासाठी किटचं संशोधन करणाऱ्या महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलं आहे

‘मिनल भोसले यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर आपल्या बाळाला जन्म दिला,’ असं म्हणत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलं आहे.

आव्हाड म्हणाले, “विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भासले यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला. पुण्याच्या डॉ. मीनल दाखवे भोसले यांचे अनंत आभार. अशा कर्तव्यनिष्ठ माणसांसमोर मान आदराने झुकते.”

दरम्यान, ‘विषाणूतज्ज्ञ मिनल भोसले मायलॅब या फार्माकंपनीत संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख म्हणून काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमनेच भारतातील पहिल्या ‘कोरोना टेस्ट किट’चा शोध लावला आहे.’