‘मोदींना पाकिस्तानची साखर कारल्या पेक्षा गोड लागते, पण देशातले प्रश्न दिसत नाहीत’

blank

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा गुरुवारी नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. मतांसाठी पवार आता पाकिस्तानची स्तुती करत आहेत, असे मोदी म्हणाले. यावर राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानची साखर चालते, कांदा चालतो, नवाज शरीफला दिलेली अचानक भेट, बिर्याणी सगळं चालतं. फक्त इथे येऊन पाकिस्तानवर टीका करायची. निवडणूक जर महाराष्ट्राची आहे तर शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बंद झालेले एक लाखापेक्षा जास्त कारखाने या सगळ्या विषयांवर मोदी का बोलत नाहीत? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी पक्षाच्या एका मेळाव्यात पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले होते. पाकिस्तानमध्ये दाखवतात इतकी परिस्थिती वाईट नाही, असे पवार म्हणाले होते. याच वाक्याचा धागा पकडत मोदींनी शरद पवारांना लक्ष्य केले. शरद पवारांसारखा अनुभवी नेता मतांसाठी चुकीचे वक्तव्य करत आहे. मात्र ते ऐकून मोठे आश्चर्य वाटत्ते. शरद पवारांना आता बाजूचा देश चांगला वाटू लागला आहे, असे मोदी म्हणाले होते.