‘चंद्रकांत पाटलांना पावसाबद्दल माहीत नाही मग ‘अबकी बार २२० पार’ हे अगोदर कसं समजतं’

टीम महाराष्ट्र देशा : साज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. या पूरग्रस्तांना राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत आहे.

या पुरामध्ये अद्यापही अनेक नागरिक अडकलेले आहेत. तसेच वीजपुरवठा आणि इतर अनेक सेवांची तारांबळ उडाली आहे. या पूरस्थिती विषयी बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एवढा पाऊस पडेल असा अंदाज नव्हता त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे असं विधान केले होते.

यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून चंद्रकांत पाटील यांना लक्ष केले आहे. आव्हाड यांनी ‘भाजप नेते मंत्री चंद्रकांत दादा म्हणतात एवढा पाऊस पडेल माहीत नव्हत. मग अब की बार 220 के पार हे कसे अगोदरच समजते #evm_सरकार.. असं ट्वीट करून चंद्रकांत पाटील आणि भाजप सरकारवर टीका केली आहे. कारण भाजपने इव्हीएम घोटाळा करून सत्ता मिळवली आहे अस आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आव्हाड यांनी याविषयी विधान केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी ‘सर्वांनी एकी ठेवली पाहिजे. तसेच संकटावर सगळे एकत्र मिळून मात करू. तसेच महाराष्ट्रातील मराठी माणूस संकटावर एकजुटीने मात करतो हे जगाला दाखवून देऊ’ अशा शब्दात राज्यातील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.