हे मी पाच वर्ष भोगले…घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत

jitendra avhad

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट गडद होत असताना दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही ढवळून निघाल आहे. संबधित तरुणाने थेट जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणानेही वेग पकडला. भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसंच भाजपच्या इतर नेत्यांनीही आव्हाडांवर जोरदार टीका केली.

मात्र जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व टीकेनंतर आपलं जाहीरपणे आपली खंत व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केलं असून त्यांना सोशल मीडियावर देण्यात येत असलेल्या धमक्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तसंच आपल्या भावनाही मांडल्या आहेत. ‘हे मी पाच वर्ष भोगले…घराची रेकी झाली…कुणी केली… हत्या करण्याचे ठरले…कोण होते त्यात…असो…आईचे आशीर्वाद…पोलीस कारवाई करतील यावर,’ असं जितेंद्र आव्हाड यांनी आपली खंत व्यक्त केली आहे.

 

दरम्यान, तरुणाने मारहाणीचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ ज्या तरुणाने त्याला माझ्या देखत आणि माझ्या माणसांनी मारहाण केलीये अशी तक्रार केली त्याला मी ओळखत नाही. माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नाही नाही त्या पोस्ट करतोय हे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी सतत 24 तास माझ्या मतदार संघात आणि सोलापूर जिल्हयात कामात व्यस्त आहे. अभियंत्याला मारहाण हा प्रकार मला मीडिया मार्फत कळाला असा खुलासाही त्यांनी केला.

याहून धक्कादायक बाब अशी की, जितेंद्र आव्हाड यांना ‘तुझा दाभोलकर होणार’ अशी धमकी देखील एका तरुणाने ट्विटरवरुन जितेंद्र आव्हाड यांना दिली आहे. तरुणाला झालेल्या मारहाण प्रकरणानंतर ही धमकी देण्यात आली आहे. एका कॅबिनेट मंत्र्यालाच अशा प्रकारे धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड काही लोकांच्या निशाण्यावर होते. त्यानंतर आता अशी उघड धमकी देण्यात आल्यानंतर याबाबत आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार, हे पाहावं लागेल.