शंभर भुंकणारी कुत्री वाघाची शिकार करु शकत नाहीत- जितेंद्र आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद यांच्यावर टीका केली होती. शरद पवार ४ खासदारांच्या जीवावर दिल्लीत राजकारण करतात. मात्र आता त्यांना दिल्लीत राहण्यासाठी नवं घर शोधावं लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या टीकेला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून उत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाडांनी शंभर भुंकणारी कुत्री वाघाची शिकार करु शकत नाहीत हे जगमान्य आहे. ४० वर्षात महाराष्ट्रात जे कोणी आले, पवार साहेबांबद्दल बोलले… पवार साहेब आहे तिथं आहेत मात्र बोलणारे काही स्वतः संपले, काही नियतीने संपवले, असं आव्हाड म्हणाले आहेत.

Loading...

दरम्यान, शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात, आता या जागा भाजपने जिंकल्यावर त्यांना दिल्लीत राहण्यासाठी घर शोधाव लागेल, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

माढा लोकसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला येथे आयोजित कार्यकर्त्यां बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी माढा मतदारसंघात पराभव होणार हे दिसल्याने पवारांनी येथून माघार घेतल्याचा टोला पाटील यांनी लगावला आहे. या निवडणुकीत बारामती लोकसभेची जागा देखील धोक्यात असल्याची टीका त्यांनी केली.

शरद पवार हे चार खासदार घेवून ते दिल्लीमध्ये जातात, त्यांच्या जीवावर सर्वांशी सौदेबाजी केली जाते. त्यामुळे आता ह्या जागाच नाही राहिल्या तर दिल्लीत राहणार कुठे हा प्रश्न पडेल. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला उद्धवस्त करुन शरद पवार यांचे राजकारणच संपवण्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.