चातुवर्ण येण्याची वाट बघा; जितेंद्र आव्हाडांची साध्वीवर टीका

टीम महाराष्ट्र देशा : भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. आताही त्यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे. मी नाले, गटारं साफ करण्यासाठी खासदार झाले नाही अस साध्वी म्हणाल्या आहेत. मध्यप्रदेशातील सीहोर येथेएका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात स्वच्छतेविषयी प्रश्नाला उत्तर देताना ‘आम्ही गटारं साफ करण्यासाठी नाही आहोत. ठीक आहे ना? आम्ही तुमचं शौचालय स्वच्छ करण्यासाठी अजिबातच नाही निवडून आलो. आम्ही जे काम करण्यासाठी निवडलो गेलो आहोत, ते काम आम्ही इमानदारीने करु. असं आम्ही पूर्वीही म्हणत होतो. आजही त्यावर ठाम आहोत आणि उद्याही आमचं म्हणणं तेच असेल’ असा साध्वी प्रज्ञा सिंग म्हणाल्या आहेत.

साध्वी प्रज्ञासिंहने आम्ही संसदेत नाले आणि शौचालये साफ करण्यासाठी आलेलो नाही, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा निषेध करत आता चातुवर्ण येण्याची वाट बघा, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी काढलाय. प्रज्ञासिंह यांना गोळवलकर गुरुजींची शिकवण असून त्या आपल्या विचारधारेप्रमाणे वक्तव्य करत असल्याचा टोला आव्हाड यांनी लगावला.