पालघरमध्ये सेनेने बाजी प्रभू देशपांडे सारखी एकाकी पावनखिंड लढवली : जितेंद्र आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा-  पोटनिवडणुकीतील निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर स्तुतिसुमने उधळली आहेत. आव्हाड यांनी सेनेला थेट बाजीप्रभू देशपांडे यांची उपमा देत कौतुक केलं आहे. त्याच बरोबर लोकशाही वाचवणं हे तर आमचंही उद्दिष्ट आहे. पण लोकशाही संपवायला निघालेल्या पक्षाबरोबर सत्तेत सामील होता आणि लोकशाही जगवण्याच्या गप्पा करता, तर तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल देखील आव्हाड यांनी शिवसेनेला विचारला आहे. तर दुसऱ्या बाजूला विविध मुद्द्यांवरून मोदी आणि भाजपवर मात्र कडाडून शेलक्या शब्दात टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

गन्ना, गटबंधन आणि गणित

पंचवार्षिक परीक्षेला अद्याप थोडा वेळ असला तरी फुलपूर आणि गोरखपूर पाठोपाठ काल कैरानाच्या घटक चाचणीत भाजपा पुन्हा नापास झाली हा मोदी-शहा यांच्याकरता मोठा चिंतेचा विषय आहे. परवा कर्नाटकच्या स्पर्धेतही काॅन्ग्रेस-जेडीएसने कौतुकास्पद चपळाईने भाजपाला मागे टाकलं. मोदी यांची फेकुगिरी लोकांना समजू लागली आणि त्यांची जादू ओसरायला प्रारंभ झाला आहे हा एक सरधोपट निष्कर्ष झाला. कालचे पोटनिवडणुकांचे निकाल थोड्या वेगळ्या चष्म्यातून पहायला हवे.

उत्तर प्रदेश हा अलिकडच्या काळात झालेला भाजपाचा बालेकिल्ला. कैरानात भाजपाचे खासदार हिम्मत सिंग यांच्या निधनामुळे ही जागा रिकामी झाली होती. त्यांची कन्या मृगांका सिंग हिला भाजपाने तिकीट दिलं. काॅग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांनी आघाडी करून तबस्सुम हसन या मुस्लिम महिलेला उभं केलं. हिंदू जाट विरुद्ध मुस्लिम यांच्यातील तणावासाठी आणि दंगलींसाठी हा भाग कुप्रसिद्ध आहे. पण गेली काही वर्षे जाट शेतकरी उसाला भाव मिळत नसल्यामुळे तीव्र नाराज आहे. मोदी आणि योगी यांनी हमीभावाची फक्त फेकाफेकी केली आहे. शेजारच्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठात बॅ. जिन्नांचा फोटो आहे. पुन्हा धार्मिक ध्रुवीकरण करायचं म्हणून भाजपाने हा फडतुस मुद्दा उकरून काढला. पण कैरानाचे शेतकरी या डावाला बळी पडले नाहीत. जिन्ना आणि गन्ना (ऊस) यात त्यांनी गन्ना महत्त्वाचा मानला.

Loading...

एखाद्या आमदार-खासदाराचं निधन झाल्यानंतर त्या जागेवर उभी असलेली त्याची पत्नी, मुलगा किंवा मुलगी सहानुभूतीच्या लाटेवर निवडून येतात अशी भारतीय मानसिकता आहे. पण जिथे आपल्याच पोटाला अन्न नाही तिथे लोकांनी भाजपाला ही सहानुभूती सुद्धा नाकारली. तबस्सुम हसन या मुस्लिम आहेत ही गोष्टही त्यांच्या विरोधात गेली नाही. राष्ट्रीय लोकदलाचा हा सामाजिक-राजकीय इंजिनियरींगचा प्रयोग यशस्वी ठरला. विरोधकांना केलेली एकजूट मतांचं गणित बदलवणारी झाली. अमित शहांच्या चाणक्यनीतीचं भक्तांन कितीही गुणगान गायचं ते गाऊ द्या. ते भूमितीत ते चांगले असले तरी अंकगणितात अजून कच्चे आहेत हे सिद्ध झालं. अंकगणित दिवसेंदिवस अवघड होत आहे. चंद्राबाबू नायडू यांनी भाजपाची साथ सोडली. शिवसेना तर एका घरात राहूनही रोज भांडी आपटत आहे. सासूनेच सुनेची मिनतवारी करावी तसे फडणवीस रोज तिच्या पाया पडतात. पण संजय राऊत यांचा तोंडपट्टा अखंड चालू आहे. आमच्यासारखे शेजारी सुद्धा या भांडणांना आता कंटाळलेत. ही बया एकदाचा घटस्फ़ोट का घेत नाही हे मात्र समजत नाही.

असो. पालघरमध्ये सेनेने कडवी झुंज दिली हे मान्य करायलाच हवं. तिने बाजी प्रभू देशपांडे सारखी एकाकी पावनखिंड लढवली. निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रिया या संदर्भात काही विचार करण्याजोगे मुद्दे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मांडले. सर्व विरोधी पक्षांना उद्देशून काही आवाहनं केली. मी एवढंच म्हणेन की आधी सत्तेतून बाहेर पडून स्वतः विरोधी पक्ष व्हा. तरच तुमचे विचार गांभीर्याने घेणं आम्हाला शक्य आहे. लोकशाही वाचवणं हे तर आमचंही उद्दिष्ट आहे. पण लोकशाही संपवायला निघालेल्या पक्षाबरोबर सत्तेत सामील होता आणि लोकशाही जगवण्याच्या गप्पा करता, तर तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा?

Loading...

भंडारा-गोंदियाची जागा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकली. ते अपेक्षित होतं. आमच्या प्रफुल्ल पटेल यांनी तिथे अलौकिक काम केलं आहे. त्यांची पुण्याई तिथे प्रचंड आहे. २०१४ च्या मोदी लाटेत ही जागा हातून निसटली होती. इतिहास असा आहे की ज्यावेळी विदर्भात विजय मिळतो तेव्हा राजकीय समीकरणं बदलतात. इंदिराजींच्या पुनरागमनाची मुहूर्तमेढ १९८० मध्ये विदर्भात रोवली गेली होती. भंडारा-गोंदियातील आमचा विजय त्या अर्थाने सूचक आहे.

Loading...

मोदींच्या थापेबाजीला कंटाळून नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. तथापि, काॅन्ग्रेस किंवा राष्ट्रवादीतर्फे आपल्याला तिकीट हवं असा हट्ट त्यांनी धरला नाही. उलट आमच्या प्रचारात ते हिरिरीने उतरले. एका विलक्षण राजकीय परिपक्वतेचं हे उदाहरण आहे. काॅन्ग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने साथ दिली. लोकशाहीविरोधी भाजपाला संपवायचं असेल तर अशा परस्पर सामंजस्याची नितांत गरज आहे हे सर्व विरोधी पक्षांना कळलं आहे. ते जसं उत्तर प्रदेशात दिसत आहे तसंच ते भंडारा-गोंदियात दिसलं. २०१९ पर्यंत, भाजपाचा पूर्ण पराभव होईपर्यंत, ते तसंच राहील याची आता खात्री पटते आहे.

आमचा विजय होणार हे भाकित निवडणुकीच्या कितीतरी दिवस आधी माझ्याकडे केलं होतं ते माझे मित्र आणि काॅन्ग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते सुनील केदार यांनी. या पोटनिवडणुकीत भाजपाला हरवायचंच हा निर्धार तिथल्या जनतेने केला आहे, हे विदर्भाची नस नस माहीत असलेल्या केदार यांनी मला सांगितलं होतं.

मोदी सरकारने परवा पेट्रोलचे दर एक पैशाने कमी केले. एक क्रूर चेष्टाच होती ती. काल १५ पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. ४ लोकसभा आणि ११ विधानसभा. लोकसभेची १ आणि विधानसभेची १ अशा दोनच जागी भाजपाला विजय मिळाला. १३ जागांवर दारूण पराभव. १ पैशाच्या चेष्टेची, एक एक जागा देऊन जनतेने सव्याज परतफेड केली हा योगायोग तर आहेच, पण तो एक काव्यात्मक न्याय सुद्धा आहे.

डाॅ. जितेंद्र आव्हाड