जिल्हा बँकांना उचल देण्याचे आदेश

अहमदनगर – पेरणीसाठी तातडीने 10 हजाराच्या कर्जवाटपापोटी देण्यात येणार्‍या उचलीसंदर्भात अडथळे दूर झाले असून कर्ज वाटप सुरू करण्याचे आदेश आजच जिल्हा बँकेस प्राप्त झाले आहेत. त्यात गरजूंनाच कर्ज मिळेल याची कठोर निकषातून खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
10 हजार रुपयांचं कर्ज मिळवण्याच्या परिपत्रकात म्हटले की, सर्व जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांनी 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या सर्व शेतकर्‍यांना खरिपासाठी 10 हजार रुपयांचे तातडीचे
कर्ज उपलब्ध करुन द्यावे. या कर्जाची हमी राज्य सरकार घेईल. शासन हमीच्या आधारावर संबंधित बँकांनी अशा शेतकर्‍यांचे स्वतंत्र खाते उघडावे आणि शेतकर्‍यांना 10 हजार रुपयांपर्यंत वाटप केलेले पीककर्ज संबंधित बँकांनी‘सरकारकडून कर्जमाफी 2017 पोटी रक्कम येणे बाकी’, असं दर्शवावे.
थकबाकीदारीची तारीख व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सदस्य,बँकांचे संचालक तसेच नगरसेवकांबाबत शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व ना. सुभाष देशमुख यांची भेट घेऊन आक्षेप नोंदविला.
या परिपत्रकात 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्यांना 10 हजारांची उचल तातडीने द्यावी असे नमूद केलेले आहे. पण 11 जूनपासून कर्जमाफ केल्याची घोषणा सरकारने केली आहे. मग तारखेत बदल कसा केला गेला असा सवाल शेतकरी संघटनेकडून करण्यात आला.
तसेच या परिपत्रकात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सदस्य, नगरसेवक याचा लाभ घेण्यास अपात्र असल्याचे नमूद केले आहे. पण यात 50 टक्के आरक्षण असून अनेक महिला आहेतं तसेच अनेक सदस्य हे अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमातींचे असतात. ते गरीब असतात. ही बाब कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ना. फुंडकर यांनी आपण याबाबत सहकारमंत्री व मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढू असे आश्‍वासन दिले.
या शिष्टमंडळात शेतकरी संघटनेचे नेते व सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील, सदस्य कालिदास आपेट, युवा संघटनेचे बाळासाहेब पटारे, अ‍ॅड. सचन धांडे, हनुमंत चाटे, मुंबईचे गणेश घुगे आदी उपस्थित होते.